एकटेपणाच्या स्वच्छ नितळ पाण्यात उगाचच तरंग उठत राहतात.
तळाच्या गाळाला धक्का न लावता… अगदी हळुवार
अचानक कोण्या काळाच्या वाऱ्यासोबत उडून एखादे आठवणीचे रंग हरवलेले पान उडत येते.
पाण्याच्या ओलाव्याने त्याला थोडासा जिवंतपणा आल्यासारखा वाटतो.
थोडे रंग चढलेत असे वाटते.
लहरीवरून ते पान उगाच इथे तिथे घुटमळते.
मग त्या आठवणीच्या पानालाही या एकटेपणाची जणू सवयच होते.
हळूच ते तळाशी जाऊन बसते. एकटेच.
कधीतरी या निशब्द आणि निरर्थक गाळाचाच एक भाग बनायचे आहे हे कळल्यागत.
आणि एकदिवस आठवणीचे ते शहाणे पान खरोखरच विरघळून जाते.