बुधवार, 7 मई 2014

मला वाटलं पाऊस येईल
पण नुसताच वारा आला  आणि धूळ उडवून गेला …

सोमवार, 5 मई 2014

आठवणीचे पान

एकटेपणाच्या स्वच्छ  नितळ पाण्यात उगाचच तरंग उठत राहतात.
तळाच्या गाळाला धक्का न लावता… अगदी हळुवार
अचानक कोण्या काळाच्या वाऱ्यासोबत उडून एखादे आठवणीचे रंग हरवलेले पान उडत येते.
पाण्याच्या ओलाव्याने त्याला थोडासा जिवंतपणा आल्यासारखा वाटतो.
थोडे रंग चढलेत असे वाटते.
लहरीवरून ते पान उगाच इथे तिथे घुटमळते.
मग त्या आठवणीच्या पानालाही या एकटेपणाची जणू सवयच होते.
हळूच ते तळाशी जाऊन बसते. एकटेच.
कधीतरी या निशब्द आणि निरर्थक गाळाचाच एक भाग बनायचे आहे हे कळल्यागत.
आणि एकदिवस आठवणीचे ते शहाणे पान खरोखरच विरघळून जाते.

सोमवार, 28 अप्रैल 2014

गोड गोड शहाणपण

तुझ्या खूप साऱ्या  गोड गोड शहाणपणात
मी हळूच माझ्या वेडपटपणाच चिमुटभर मीठ टाकलं
आणि गंमतच झाली
शहाण्या सुरत्या तुला समजलंच नाही,
तुझ्या गुळमुळीत आयुष्याला कशी काय चव आली … 

शब्द सारे राहिले मागल्या तीरी

शब्द सारे राहिले मागल्या तीरी …
मी वल्हवुन आले होडी कोऱ्या कागदाची
या इथल्या तीरावर
रंग सारे स्तब्ध होते
काही मिसळले एकमेकात
अन काही घुमे, उपरे आणि परकेच होते
काही वितळून पार गेले
काही ओघळता ओघळता थांबून गेले होते
उधाण वाऱ्याने आणली होती अंतरीक्षामधून आठवणीची अबोल धूळ
तीही थांबली … रंगांना चिकटून राहिली होती
या आठवणींच्या पोतावरून हलकेच फिरवावा हात
काही क्षण-कण  बोट धरून सोबत येऊ पाहत होते
परत फिरावे आता माघारी …
होडी कोऱ्या कागदाची विरघळून कधीच गेली होती
आणि शब्द सारे मागल्या तीरी राहून गेले होते

शनिवार, 8 मार्च 2014

बुधवार, 5 फ़रवरी 2014

असे म्हणतात कि "पेरावे ते उगवते." पण खरेच असे आहे का?
कधी कधी आपण पेरतो ते उगवतच नाही.
… आणि जे पेरलेले नसते तेच नेमके उगवते.

बुधवार, 8 जनवरी 2014

उशाशी स्वप्ने घेऊन झोपले होते.
पहाटे पहाटे जाग आली. चाचपून पहिले उशाखाली … स्वप्ने आहेत न तिथे …
माझ्या आधीच जागी होऊन स्वप्ने उडून गेली होती.
पाखरे बनून झाडाच्या फांदीवर बसून गात होती.
दाणे टाकले अंगणात. परत माघारी बोलावले त्यांना …
नाही परतली ती.
उडून गेल्या त्या स्वप्नाचे पंख वाऱ्याचे की काय होते म्हणे. 
पाण्यात विरघळावे …. पाण्याचा रंग व्हावे …. कागदभर पसरत जावे … मनाला येईल तसे ओघळावे … कागदामध्ये रुतून बसावे …. जाणवणारे , काही जाणीवेपलीकडचे असे आकार बनावे … पाण्याचे बंधन सुकून जाईल कधीतरी … पण आपण मात्र कोरड्या कागदाला चिकटूनच बसावे …

रविवार, 5 जनवरी 2014

चालताना अंधारल्या पावलांना चांदण्यांचा स्पर्श झाला
भेगाळलेल्या तळव्यांवर वर्ख चांदीचा चढला
वाट वळत गेली डोंगराआडून…  कधी  ढगाआडून …
रंगहीन, अदृश्य हृदयाचा जणू चंद्र झाला ….